मुंबई–ठाण्यासह २९ महापालिकांची रणधुमाळी; १५ जानेवारीला मतदान, १६ ला निकाल

Spread the love

मुंबई–ठाण्यासह २९ महापालिकांची रणधुमाळी; १५ जानेवारीला मतदान, १६ ला निकाल

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : मुंबई, ठाण्यासह राज्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. कार्यक्रम जाहीर होताच राज्यभर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांत सुमारे ३ कोटी ४८ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

🔴 ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या निवडणुकांना अखेर मार्ग

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या पाच ते सात वर्षांपासून, तर काही ठिकाणी त्याहून अधिक काळ महापालिका निवडणुका रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. त्याच पार्श्वभूमीवर २ डिसेंबर रोजी नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. आता त्यानंतर प्रलंबित असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील २७ महापालिकांची मुदत आधीच संपली असून, जालना आणि इचलकरंजी या दोन नव्या महापालिकांमध्ये प्रथमच निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदान यादी ग्राह्य धरली जाणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने, त्यामध्ये नावे वगळण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणूक वेळापत्रक

नामनिर्देशन पत्र स्वीकारणे : २३ ते ३० डिसेंबर

अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर

उमेदवारी माघार : २ जानेवारी

चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : ३ जानेवारी

🔴 मतदान : १५ जानेवारी

🔴 मतमोजणी व निकाल : १६ जानेवारी

🔴 मतदानाची तयारी

या निवडणुकांसाठी राज्यभरात ३९,१४७ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यापैकी मुंबईतच १०,१११ मतदान केंद्रांचा समावेश आहे. एकूण ११,३४९ कंट्रोल युनिट्स आणि २२,००० बॅलेट युनिट्स वापरण्यात येणार आहेत.

🔴 मतदान पद्धत व उमेदवारी अर्ज

मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड रचना असल्याने मतदारांना एकच मत द्यावे लागणार आहे. उर्वरित २८ महापालिकांमध्ये एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान करावे लागेल. उमेदवारी अर्ज केवळ ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही, त्यांनी निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत ते सादर करणे बंधनकारक राहील.

ज्या महापालिकांमध्ये निवडणूक

बृहन्मुंबई – २२७

भिवंडी-निजामपूर – ९०

नागपूर – १५१

पुणे – १६२

ठाणे – १३१

अहमदनगर – ६८

नाशिक – १२२

पिंपरी-चिंचवड – १२८

औरंगाबाद – ११३

कल्याण-डोंबिवली – १२२

नवी मुंबई – १११

अकोला – ८०

अमरावती – ८७

लातूर – ७०

नांदेड-वाघाळा – ८१

मीरा-भाईंदर – ९६

उल्हासनगर – ७८

चंद्रपूर – ६६

धुळे – ७४

जळगाव – ७५

मालेगाव – ८४

कोल्हापूर – ९२

सांगली-मिरज-कुपवाड – ७८

सोलापूर – ११३

इचलकरंजी – ७६

जालना – ६५

पनवेल – ७८

परभणी – ६५

दीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या महापालिका निवडणुकांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon