लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, धमक्या व बदनामीचा प्रयत्न; पेण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
अलिबाग : ओळखीच्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नास नकार देत तिला धमक्या दिल्याचा धक्कादायक प्रकार पेण येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, लग्नाची वेळ आल्यावर त्याने अचानक माघार घेतली. त्यानंतर फिर्यादीने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिल्यावर आरोपीने “तुझे दुसऱ्याशी लग्न होऊ देणार नाही,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याचबरोबर आरोपीने फिर्यादीसोबतचे खासगी फोटो तिच्या नवऱ्याला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून पाठवण्याची धमकी देत बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २७५/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड संहिता कलम ६९, ३५१(२) आणि ३५६(२) अंतर्गत कारवाई सुरू आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वेगुर्लेकर करत आहेत. आरोपीच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलिसांनी फिर्यादीला आवश्यक संरक्षणात्मक उपाय उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या धमक्या व बदनामीचे प्रयत्न महिलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असून स्थानिक नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.