विद्यार्थीनीला १०० उठाबशांची शिक्षा भोवली! सरकारने शाळेची मान्यता केली रद्द
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पालघरच्या वसईच्या सातिवली येथील श्री हनुमंत मंदिर शाळा कुवरापाडा येथे एक धक्कादायक घटना घडली होती. महिला शिक्षकाने उशिरा शाळेत आलेल्या १३ वर्षीय विद्यार्थीनीला १०० उठाबशांची शिक्षा दिली होती. या शिक्षेमुळं विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता.या प्रकरणामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तसच पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीही व्यक्त केली होती.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत वसईतील श्रीमती मनरादेवी एज्युकेशन संस्था,कांदिवली पूर्व मुंबई संचालित श्री हनुमंत विद्यामंदिर शाळा कुवरापाडा सातीवली पूर्व केंद्र वालीवच्या इंग्रजी आणि हिंदी माध्यमांच्या शाळांची मान्यता शिक्षण विभागाने रद्द केली आहे. या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी पांडुरंग गलांगे, विस्तार अधिकारी राजेंद्र उबाळे, केंद्र प्रमुख कैलास चव्हाण यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
उशिरा शाळेत आल्याने विद्यार्थिनीला महिला शिक्षकाने १०० उठाबशांची शिक्षा दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. ही धक्कादायक घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी तपास केल्यानंतर शाळेवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, शैक्षणिक सुविधांची वानवा आणि शिक्षक हक्क कायद्याचे पालन न केल्याने या शाळा प्रशासनाला शिक्षण विभागाने धारेवर धरले.
चौकशी अहवालानुसार,शिक्षण हक्क कायद्याच्या कलम १७ अंतर्गत शारीरिक शिक्षा पूर्णतः प्रतिबंधित असतानाही शिक्षकाने विद्यार्थिनीला उठाबशांची शिक्षा सुनावली. या शिक्षेमुळं संबंधीत विद्यार्थीनीचा मृत्यू झाला, असा आरोप होता. ही घटना बाल संरक्षण कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करते. दोन्ही शाळांमधील अनेक शिक्षकांकडे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.