ठाण्यात रस्ता रुंदीकरण आणि भुयारी मार्गावरील तांत्रिक कामांमुळे सोमवार पासून पुढील चार महिने वाहतूक बदल

Spread the love

ठाण्यात रस्ता रुंदीकरण आणि भुयारी मार्गावरील तांत्रिक कामांमुळे सोमवार पासून पुढील चार महिने वाहतूक बदल

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाण्यातील एका महत्त्वाच्या मार्गावर सोमवार १५ डिसेंबरपासून वाहतूक बदल करण्यात आले आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे हे बदल पुढील चार महिने लागू राहणार आहेत. माजिवाडा ते वडपे दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने या पट्ट्यातील वाहतूक वळवण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खारेगाव भुयारी मार्गावर तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार असून, त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक बंदी जाहीर करण्यात आली आहे. ही बंदी सोमवार पासून लागू होऊन थेट ९ एप्रिल २०२६ पर्यंत राहणार आहे. परिणामी, पुढील चार महिने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ही वाहतूक बंदी २४ तास लागू राहणार असल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गावरून दररोज मुंबई, ठाणे, कळवा, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या शेकडो वाहनांची वर्दळ असते. ही वाहने माजिवाडा ते वडपे या पट्ट्यातून प्रवास करतात. मात्र, रस्ता अरुंद असल्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर खारेगाव भुयारी मार्गावर एमएसआरडीसी कडून तांत्रिक कामे केली जाणार असल्याने वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. ही बंदी पुढील चार महिने कायम राहणार आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरून खारेगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका, गॅमन रोड, पारसिक चौक किंवा साकेत येथून खाडी पूल मार्गे प्रवास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भिवंडी आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवरही काही ठिकाणी प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. भिवंडीकडे जाणाऱ्या वाहनांना खारेगाव, पारसिक चौक आणि गॅमन रोड मार्गे वळवण्यात येणार आहे, तर ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कळवा खाडी पूल हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.

ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली असून, आपत्कालीन सेवांसाठी ही बंदी लागू नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईसह कळवा–मुंब्रा आणि कल्याण–डोंबिवलीतील अनेक प्रवासी नाशिक, गुजरात, पनवेल आणि कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon