पाळीव कुत्रा चावल्याने रागात भरात सोसायटीच्या व्यक्तीकडून टेलिव्हिजन अभिनेता अनुज सचदेवावर जीवघेणा हल्ला

Spread the love

पाळीव कुत्रा चावल्याने रागात भरात सोसायटीच्या व्यक्तीकडून टेलिव्हिजन अभिनेता अनुज सचदेवावर जीवघेणा हल्ला

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – टेलिव्हिजन अभिनेता अनुज सचदेवानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावरुन सर्वांना धक्का बसला आहे. अभिनेत्यानं व्हिडीओमध्ये सांगितलंय की,रविवारी रात्री त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. मुंबईतील गोरेगावमध्ये अभिनेता ज्या सोसायटीत राहतो, तिथल्या एका व्यक्तीनं त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. तसेच, अभिनेत्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अनुजचा पाळीव कुत्रा चावल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर, रागाच्या भरात त्या व्यक्तीनं थेट अनुजला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली, असं अभिनेत्यानं सांगितलं.

अनुजनं सोशल मीडियावर संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. अनुजनं त्या व्यक्तीचे सर्व डिटेल्सही शेअर केले आहेत. अनुजनं सांगितलं की, त्या व्यक्तीनं अनुजवर एवढा जोरदार हल्ला केला की, या हल्ल्यात अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली असून त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं. त्यानंतर दोन सिक्युरिटी गार्ड्सनी येऊन त्या व्यक्तीला पकडलं. तरीसुद्धा ती व्यक्ती अभिनेत्याला शिवीगाळ करत होती. एवढंच नाहीतर त्या व्यक्तीनं अभिनेत्याला जीवेमारण्याचीही धमकी दिली.

अभिनेत्यानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “या माणसानं मला किंवा माझ्या मालमत्तेला हानी पोहोचवण्यापूर्वी मी हे पुरावे शेअर करतोय. त्यानं माझ्या कुत्र्यावर हल्ला करण्याचा आणि काठीनं मारण्याचा प्रयत्न केला कारण मी सोसायटीच्या ग्रुपमध्ये नमूद केलं होतं की, त्याची गाडी सोसायटीच्या पार्किंगमध्ये चुकीच्या ठिकाणी पार्क केली आहे. मी या माणसाची माहिती शेअर करतोय. कृपया हे त्यांच्यासोबत शेअर करा, जे त्याच्याविरुद्ध कारवाई करू शकतात… माझ्या डोक्यातून रक्त येतंय.

अभिनेता अनुजनं पुरावा म्हणून इंस्टाग्रामवर त्या माणसानं त्याच्यावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तो माणूस अनुजवर हल्ला करण्यासाठी धावत असल्याचं दिसतंय. तो अनुजवर काठीनं अनेक वेळा हल्ला करतो. रागाच्या भरात तो माणूस म्हणतो, “तुला कुत्रा चावेल का? मी त्याला मारून टाकेन…” भांडण पाहून सिक्युरिटी गार्ड्स येतात आणि हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पकडतात. अनुजनं त्याला मारहणा करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. त्या व्यक्तीबाबत अनुज सचदेव म्हणतो की, “या माणसानं मला काठीनं मारलंय. त्यानं माझ्यावर हल्ला केलाय. त्यानं मला मारण्याचा प्रयत्न केलाय…” अनुजवरील या सार्वजनिक हल्ल्याचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon