अकोल्यात ऑपरेशन ‘प्रहार’चा धडाका! नायलॉन मांजाच्या गोदामावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, टोळीचा मास्टरमाइंड गजाआड
पोलीस महानगर नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात प्रतिबंधित चायनिज नायलॉन मांजाच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी अकोला पोलिसांनी ऑपरेशन ‘प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेने डाबकी रोड परिसरातील एका गोदामावर छापा टाकून तब्बल एक लाख रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला. या प्रकरणात अमीर खा आजिज खा (वय ३०, रा. अकोला) याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या विक्रेत्यांवर काटेकोर कारवाई सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेला रामपिर नगर, खैरमोहमंद प्लॉट परिसरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा साठवला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी पथकाने अचानक धाड टाकून साठा जप्त केला.
अटक केलेल्या अमीर खा आजिज खा याच्याविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात
कलम ११०, २२३, ३(५) बीएनएस तसेच पर्यावरण अधिनियमातील कलम ४, ५, १५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नायलॉन मांजा वापरामुळे दरवर्षी अनेक पक्षी, मोकाट प्राणी आणि नागरिक जखमी होतात. त्यामुळे या साहित्यावर सरकारने बंदी घातली असून त्याची विक्री गंभीर गुन्हा मानली जाते.
अकोला पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री किंवा साठा आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या धाडीत मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही मोहीम राबवली. अंमलबजावणी करणाऱ्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, माजीद पठाण, हेड कॉन्स्टेबल सुलतान पठाण, खुशल नेमाडे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश मानकर, धीरज वानखेडे, मो. आमिर,राज चंदेल आणि मनीष ठाकरे यांचा समावेश होता.
अकोला पोलिसांनी स्पष्ट केले की, नायलॉन मांजाविरोधातील ही मोहीम अधिक कडकपणे राबवली जाईल आणि जिल्ह्यातील अवैध साठा पूर्णतः नष्ट केला जाणार आहे.