ध्वनीप्रदूषण करणाऱ्या दुचाकी सायलेंसरवर पनवेल पोलिसांचा ‘रोडरोलर’ चालवून दणदणीत बंदोबस्त
पनवेल : वडाळे तलाव परिसरात भरधाव वेगाने दुचाकी चालवणारे तसेच कानठळ्या बसवणारा फटफट आवाज करणारे मॉडिफाइड सायलेंसर वापरणाऱ्या रोडरोमिओंवर पनवेल पोलिसांनी कडक कारवाई केली. ध्वनीप्रदूषणाबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि वाहतूक नियमांचे वारंवार होणारे उल्लंघन लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान पनवेल पोलिसांनी अवैधरीत्या बदल करण्यात आलेले व अत्याधिक आवाज करणारे अनेक दुचाकी सायलेंसर जप्त केले होते. आज वडाळे तलाव परिसरात या जप्त सायलेंसरवर रोडरोलर चालवून ते नष्ट करण्यात आले. ध्वनीप्रदूषणाविरुद्ध पोलिसांनी उचललेले हे पाऊल प्रतीकात्मक तसेच कायदा-अमलबजावणीबाबतचा स्पष्ट संदेश देणारे ठरले आहे.
पोलिसांनी सांगितले की, ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास टाळणे, वाहतुकीचा शिस्तबद्ध प्रवाह राखणे आणि नियमांचे पालन करण्यास वाहनचालकांना प्रवृत्त करणे, हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे. “बेकायदेशीर सायलेंसर लावणाऱ्यांवर पोलिसांचा कठोर हात कायम राहील,” असा इशारा पनवेल पोलिसांनी दिला आहे.
या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत पोलिसांचे कौतुक केले.