तहसिलदार आशा वाघ अडचणीत; बनावट स्वाक्षऱ्यांच्या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
केज : महसूल विभागातील गैरकारभाराच्या नव्या प्रकरणाने उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. केज तहसिल कार्यालयातील तत्कालीन नायब तहसिलदार आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथे संजय गांधी योजनेच्या तहसिलदार म्हणून कार्यरत असलेल्या आशा दयाराम वाघ यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तहसिलदार राकेश गिड्डे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये बनावट आदेश दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश ‘सकाळ’ने केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तहसिलदार राकेश गिड्डे यांना सदर प्रकरण फौजदारी गुन्ह्यास पात्र असल्याने तातडीची कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी उशिरा रात्री गिड्डे यांनी केज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, वाघ यांनी फेब्रुवारी ते जूनदरम्यान दहिफळ वडमाऊली, लाडेगाव, नांदूरघाट आणि वाघेबाभुळगाव येथील जमिनींसंदर्भात बनावट अर्धन्यायिक आदेश काढले. या आदेशांवर गिड्डे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. संबंधित संचिका व कागदपत्रेही वाघ यांनी स्वतःकडेच ठेवली होती, असेही फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.
नायब तहसिलदार ए. एन. भंडारे, सहाय्यक महसूल अधिकारी जी. पी. नन्नवरे आणि महसूल सहाय्यक एम. के. कोकरे यांच्या साक्षींच्या आधारे हा प्रकार उघड झाला. याशिवाय आपत्ती निवारण कामात दुर्लक्ष, निवडणूक कामात हयगय आणि गैरहजेरी यासह अनेक ठपके वाघ यांच्यावर ठेवण्यात आले असून विभागीय चौकशीचा प्रस्तावही तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
तहसिलदारांच्या कथित बनावट आदेशांची नोंद अधिकार अभिलेखात घेण्याचे निर्देश वाघ यांनी व्हॉट्सअॅपद्वारे अधिकाऱ्यांना दिल्याचेही समोर आले आहे. या बेकायदेशीर कृत्यांमुळे तहसिलदार, संबंधित शेतकरी आणि प्रशासनाची दिशाभूल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
केज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमोल उनवणे यांनी, “तहसिलदारांच्या फिर्याद आणि कागदपत्रांच्या आधारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे,” असे सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील महसूल विभागात अलीकडेच उघडकीस आलेल्या २४१ कोटी रुपयांच्या बनावट लवाद आदेश घोटाळ्यातून सावरण्याची वेळ येण्यापूर्वीच या नव्या प्रकरणाने प्रशासनातील गैरव्यवहार पुन्हा चर्चेत आले आहेत.