ठाणे खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई; मेफेड्रोनसह पिस्तूल जप्त, दोन जणांना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मेफेड्रोन (एम.डी.) विक्री करणाऱ्या सराईत इसमावर धडक कारवाई करून तब्बल १०,८८,००० रुपये किंमतीचा १०८.८ ग्रॅम एम.डी., तसेच बेकायदेशीर अग्नीशस्त्र आणि जिवंत काडतूस जप्त केले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ११,४१,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे ८ डिसेंबर रोजी उशिरा रात्री पथकाने श्री गजानन रेसिडेन्सी, दिनकर विहार, आडवली-ढोकाळी, कल्याण पूर्व येथील रुम क्रमांक ००२ वर छापा टाकला. या कारवाईत आकिब इकबाल बागवान (३३) हा एम.डी.सह पिस्तूल बाळगल्याच्या आरोपावरून पकडला. त्याच्याकडील अंमली पदार्थाचे वजन १०८ ग्रॅम ८ मिलीग्रॅम इतके असून बाजारभावानुसार किंमत १० लाखांहून अधिक आहे. याशिवाय ५०,००० रुपये किंमतीचे गावठी पिस्तूलही जप्त करण्यात आले.
तपासात आकिब बागवान हा सराईत गुन्हेगार असून बाजारपेठ पोलीस स्टेशन, कल्याण येथील दोन एनडीपीएस गुन्ह्यांमध्ये तो पाहिजे असल्याचे उघड झाले. चौकशीत त्याने जप्त पिस्तूल भरत शत्रुध्न यादव याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे यादवला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडून एक जिवंत काडतूस आढळले.
या प्रकरणी दोन्ही आरोपींवर मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक १५०२/२०२५ नुसार एनडीपीएस अॅक्ट ८(क), २१(क) तसेच भारतीय हत्यार कायदा ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१)/१३५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाई डीसीपी अमरसिंह जाधव, एसीपी विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, तसेच पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली. पुढील तपास सपोनि सुनील तारमळे करीत आहेत.