उद्धव ठाकरेंचा फडणवीस–शाहांवर जोरदार पलटवार; “भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलंस तू”
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आज शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा परिसरात आमदार व पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन राजकीय वातावरण तापवले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला करारी शब्दांत प्रत्युत्तर दिले. अलीकडेच फडणवीस यांनी “कोण होतास तू, काय झालास तू” अशा शब्दांत टीका केली होती. त्यावर ठाकरेंनी पालटवार करताना म्हटले, “मुख्यमंत्र्यांची मला दया येते; एवढे सगळे भ्रष्टाचारी स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू. काय होतास तू, काय झालास तू—भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलंस तू.” महाराष्ट्राची ही संस्कृती नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
🔴 अमित शाहांवर थेट निशाणा
अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर हिंदुत्वाबाबत टीका केली होती. त्यावर ठाकरेंनी प्रत्युत्तर देताना म्हटले,
“अमित शाहांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. संघांनी तर शिकवूच नये. तुमच्या मंत्रिमंडळातील किरण रिजीजू म्हणतात, ‘मी गोमांस खातो.’ ९ डिसेंबरचा फोटो आहे—अमित शाह त्यांच्यासोबत जेवत आहेत. मग गोमांस खाणाऱ्या मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घेणार का?” याशिवाय त्यांनी जय शाह यांच्यावरही टीका करत “पाकिस्तानसोबत भारताला खेळायला लावणारा जय शाह हिंदुत्ववादी नाही का?” असा सवाल केला.
🔴 शेतकरी प्रश्नावर सरकारवर टीका
राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचीही भूमिका ठाकरेंनी धारेवर धरली.
“केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले राज्याकडून प्रस्तावच आला नाही. मग घाईघाईत प्रस्ताव पाठवला. त्यात नेमकं काय आहे? पीकविमा कंपन्यांची थट्टा सुरू आहे. सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
🔴 विपक्षनेते पद, अधिवेशन आणि निवडणुका
पहिल्या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव दिले असतानाही निर्णय न घेणाऱ्या सरकारवरही त्यांनी टीका केली. “विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का? बिननंबरच्या मंत्र्यांची काय किंमत?” असा सवाल त्यांनी केला. राज्यातील नगरपालिका निवडणुकांतील “दंडेलशाही आणि पैशांचा अमाप वापर” हा मुद्दा उपस्थित करत, “असल्या निवडणुका मी कधी पाहिल्या नाहीत,” असेही ते म्हणाले.
🔴 ‘लाडकी बहिणींना २१०० रुपये’—स्मरणपत्र
सरकारच्या निवडणूक वचनाची आठवण करून देत ठाकरेंनी म्हटले, “लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं वचन दिलं होतं; ते देणार की नाही? नाही दिले तर त्यांना घरी बसावं लागेल.”
उद्धव ठाकरेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.