कोकणातील बड्या उद्योजकावर ईडीची छापेमारी; रत्नागिरीत तणाव, कंपनीबाहेर कडक पोलीस बंदोबस्त
पोलीस महानगर नेटवर्क
रत्नागिरी : कोकणातील उद्योगजगताला हादरा देणारी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एका बड्या उद्योजकावर पहाटे अचानक छापेमारी केली. सावर्डे आणि खेड भरणेनाका परिसरातील दोन वेगवेगळ्या कंपन्यांवर ही छापेमारी एकाचवेळी सुरू झाली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कातव्यवसायाशी संबंधित असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आलेल्या या उद्योजकाबाबतच्या चौकशीमुळे उद्योग जगतात तसेच राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. हा उद्योजक रत्नागिरीतील एका प्रभावी नेत्याच्या जवळचा असल्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या आहेत. पहाटेपासून सुरू असलेल्या या धाडीसंदर्भात ईडीकडून कसलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीयतेत पार पाडली जात आहे.
ईडीचे अधिकारी मोठ्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून कंपनीतील कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, नोंदी आणि संगणकीय डेटा यांची तपासणी सुरू आहे. दोन्ही ठिकाणी सततची हालचाल, अधिकाऱ्यांची ये-जा आणि पोलीस बंदोबस्तामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
या उद्योजकाचा व्यवसाय तसेच राजकीय वावर मोठा असल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अलीकडेच मुरुड येथील एका रिसॉर्टविषयीच्या वादाच्या पार्श्वभूमीवरही ईडीचे पथक कोकणात दाखल झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोकण ईडीच्या रडारवर आल्याने अनेक उद्योजकांची झोप उडाल्याचे बोलले जात आहे.
ईडीच्या या कारवाईमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या या धाडीसत्राने उद्योग आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.