लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – पुणे जिल्ह्यातील सहकार कार्यालयात काही दिवसांपूर्वी लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली होती. त्यामुळे, प्रशासनातील भ्रष्टाचार हा काही केल्या थांबत नसल्याचे समोर आले असून नागरिकांमधून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयात चिरीमिरी दिल्याशिवाय कामच होत नाही, अशी सर्वसामान्यांची ओरड असते. त्यामुळे, अगदी तलाठ्यापासून ते प्रांत अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण एसीबीची जाळ्यात अडकले आहेत. आता, नाशिकमध्ये अडीच लाख रुपयांची लाच घेतांना सिन्नरचे नायब तहसीलदार संजय धनगर एसीबीच्या जाळ्यात अडकले.
जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यात तहसीलदाराने तक्रारदाराकडे तब्बल १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर, तडजोडीत अडीच लाखांची लाच स्वीकारताना नाशिकच्या एसीबीने तहसीलदार संजय धनगर यांना रंगेहात पकडले. शहरातील सोपान हॉस्पिटलसमोर ही लाच स्वीकारत असताना एबीसीने थेट धाड टाकत अटक केली. त्यानंतर, येथील मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तर, सर्वसामान्यांकडून या कारवाईचं स्वागत होत असून प्रशासनातील भ्रष्टाचार हा संतापजनक प्रकार असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे.