शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब; शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कॅशबॉम्बनंतर आता आणखी एका मंत्र्याचं प्रकरण समोर आलं आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर आला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी हा व्हिडीओ समोर आणला आहे. त्यामुळे ऐन अधिवेशनाच्या काळात शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे.
या आधी ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी सोमवारी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नोटांसह व्हिडीओ समोर आणला होता. ते प्रकरण चर्चेत असतानाच आता त्यांच्याच पक्षाचे मंत्री भरत गोगावलेंचाही व्हिडीओ समोर आला आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पुन्हा थेट गंभीर आरोप केलेत. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. सर्वाधिक गुन्हे असलेले हे आमदार आहेत. गेल्या वेळी त्यांच्या पत्नीचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यांनी ‘५० खोके’ म्हटलं तर कॅशबॉम्ब वाल्यांची बायको माझ्यावर धावत आली. आता त्यांच्या पतीचा व्हिडीओ व्हायरल झाला असं चित्रलेखा पाटील म्हणाल्या.