मुंबई पोलिसांची मोठी कारवाई : ५ कोटींचा अंमली पदार्थ नष्ट
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करत मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. विविध पाच गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला १,८१५ किलो गांजा तसेच २७,८८० कोडीन मिश्रित सिरपच्या बाटल्या मंगळवारी (८ डिसेंबर २०२५) नाश करण्यात आल्या. हा सर्व मुद्देमाल पनवेल येथील एमआयडीसी तळोजा परिसरातील ‘मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड’च्या बंदिस्त भट्टीत जाळून नष्ट करण्यात आला.
यापूर्वी मे आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये सुद्धा मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ नष्ट केले होते. त्या दोन कारवायांमध्ये ६९२ किलो अमली पदार्थ तसेच १२,३४१ कोडीन मिश्रित बाटल्या (एकूण किंमत १३० कोटी ८६ लाख रुपये) नष्ट करण्यात आल्या होत्या. सद्याच्या तिसऱ्या कारवाईनंतर २०२५ या वर्षात आतापर्यंत एकूण २,५०७ किलो अंमली पदार्थ व ४०,२२१ कोडीन मिश्रित बाटल्या (एकूण किंमत अंदाजे १३६ कोटी रुपये) नष्ट करण्यात आल्या आहेत.
‘अंमली पदार्थ मुक्त मुंबई’ या उद्दिष्टाने मुंबई पोलीस दल सातत्याने कठोर कारवाई करत असून समाज सुरक्षित ठेवण्याचा निर्धार अधिक ठामपणे व्यक्त केला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्या सहकार्याने पार पडली.
उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल कमिटीच्या विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील (अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र), पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे (अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिडेकर यांच्या देखरेखीखाली नाशाची प्रक्रिया पार पडली.
या प्रक्रियेदरम्यान कलीना येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक (भांडारगृह) सचिन पाटील, सहायक फौजदार शेडगे, पोलीस शिपाई जाधव, मुख्य पोलीस शिपाई जेठे यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांनी ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली.
मुंबई पोलीस दलाने अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका ठामपणे कायम ठेवत भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असे संकेत देण्यात आले आहेत.