गोसेखुर्द कालव्यात अडकलेला जखमी वाघ वाचविण्यात यश; वन विभागाच्या तत्परतेने टळली अनर्थाची शक्यता
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील पाऊणी तालुक्यात धानोरी गावाजवळ इंदिरा सागर (गोसेखुर्द) प्रकल्पाच्या उजव्या काठाच्या मुख्य कालव्यात आज सकाळी जखमी अवस्थेत अडकलेला वाघ वन विभागाच्या तत्पर बचावकार्यामुळे सुखरूप बाहेर काढण्यात आला. सकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास पाऊणी–सावरला रस्त्यालगतच्या कालव्यात दमछाक झालेला वाघ असहाय्य अवस्थेत पडलेला असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले.
गावकऱ्यांनी तातडीने याची माहिती वन विभागाला दिली. बातमी मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर सील करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली. संभाव्य मानव–वन्यजीव संघर्ष टाळत अत्यंत सावधगिरीने बचावकार्य राबविण्यात आले.
जखमी अवस्थेत असूनही वाघ शांतपणे बचावकार्याला सहकार्य करत होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. विशेष पिंजऱ्याच्या साहाय्याने वाघाला सुखरूप बाहेर काढून तत्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा बचाव व पुनर्वसन केंद्रात हलविण्यात आले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “वाघाला काही अंतर्गत जखमा असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. गोरेवाडा येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल.”
या यशस्वी बचावकार्यात गावकऱ्यांची तत्परता आणि वन विभागाच्या पथकाचे धाडस व संयम निर्णायक ठरले. या घटनेमुळे निसर्गसंवर्धनासाठी मानव आणि यंत्रणा एकत्र आल्यास मोठी कामगिरी साध्य होऊ शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, वन्यजीवप्रेमींनी या मोहिमेचे सर्वत्र कौतुक केले आहे.