ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे २५ लाखांची खंडणी; दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करून त्या मागे घेण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला असून, त्यापैकी २ लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी दोघा भावांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनुमान प्रभाकर दराडे (रा. नागरेनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) हे मोडाळे (ता. इगतपुरी) येथील ग्रामपंचायत अधिकारी आहेत. आरोपी केशव गुलाब बोडके व दिनकर गुलाब बोडके (दोघे रा. वाडीवडे, ता. इगतपुरी) यांनी संगनमत करून मोडाळे गावातील विकासकामांच्या चौकशीच्या नावाखाली दराडे यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल केल्या. या तक्रारी मागे घेण्यासाठी त्यांनी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
२९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाथर्डी फाटा येथील हॉटेल सेवन हेवन येथे आरोपींनी फिर्यादी दराडे यांना भेटून दमदाटी व जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध २ लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, प्रत्यक्ष भेटून व त्यांच्या हस्तकांमार्फत वेळोवेळी जिवे मारण्याच्या धमक्या देऊन “उपोषणाला बसतो, कामावर अडथळे आणतो, बदली व बडतर्फ करतो,” अशा धमक्यांद्वारे मानसिक त्रास दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार करीत आहेत.