सप्तशृंगी गड घाटात इनोव्हा दरीत कोसळून भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : सप्तशृंगी गडावरील गणपती घाट परिसरात सोमवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. दर्शनासाठी जात असलेली इनोव्हा कार (क्रमांक एमएच १५ बीएन ०५५५) सुमारे १००० ते १२०० फूट खोल दरीत कोसळल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर वाहनात एकूण सात प्रवासी होते. यापैकी सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला असून एक प्रवासी गंभीर जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत प्रवासी हे पिंपळगाव चिंचखेड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप मृतांची औपचारिक ओळख पटलेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खोल दरीमुळे बचावकार्य अडचणीचे ठरत असले तरी युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू असून परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.
या भीषण अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात येत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.