कल्याण–डोंबिवलीत ४७ रॅपिडो दुचाकीस्वारांवर ‘आरटीओ’ची धडक कारवाई; एका खासगी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

कल्याण–डोंबिवलीत ४७ रॅपिडो दुचाकीस्वारांवर ‘आरटीओ’ची धडक कारवाई; एका खासगी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : मोटार वाहन अधिनियमाचे उल्लंघन करून तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाचा आवश्यक पक्का परवाना न घेता नियमबाह्य पद्धतीने रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या ४७ दुचाकीस्वारांवर कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधित चालकांकडून एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आला असून, याप्रकरणी एका खासगी कंपनीविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ९३ नुसार रॅपिडो दुचाकी सेवेसाठी चालक व मालकांना परिवहन विभागाकडून आवश्यक परवाना घेणे बंधनकारक आहे. परिवहन विभागाच्या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतरच अशा सेवेसाठी पक्का परवाना दिला जातो. मात्र, शासनाच्या धोरणाचे उल्लंघन करून ओला, उबेर, रॅपिडो आदी ऑनलाईन उपयोजनांच्या माध्यमातून अनेक खासगी कंपन्या पेट्रोल दुचाकींवर बेकायदा प्रवासी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यक्षेत्रात ही नियमबाह्य सेवा दिल्याप्रकरणी एकूण ४७ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेषतः कल्याण–डोंबिवली परिसरात अशा प्रकारच्या दुचाकींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेकायदा प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले आहे. या दुचाकीस्वारांकडे कोणताही वैध प्रवासी वाहतूक परवाना नसून शासनाने त्यांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिलेली नाही.

दरम्यान, कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक सुप्रिया गावडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार जानेवारी २०२५ पासून रॅपिडो सेवा देणाऱ्या ‘द रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनी व त्यांच्या संचालकांविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रवासी वाहतुकीची आवश्यक परवानगी न घेता ऑनलाईन उपयोजनाच्या माध्यमातून प्रवाशांची नोंदणी करून त्यांना सेवा देत बेकायदा प्रवासी वाहतूक केल्याचा तसेच शासनाचा महसूल बुडविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी नागरिकांना आवाहन केले की, कोणताही धोका टाळण्यासाठी प्रवाशांनी अशा बेकायदा रॅपिडो दुचाकी सेवांचा वापर करू नये. वैध परवाना नसलेल्या वाहनांतून प्रवास केल्यास जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon