१०० दिवसांचा कृती आराखडा; ठाणे पोलीस आयुक्तालयात तक्रार निवारण दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयात १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार शनिवार व रविवार (६ व ७ डिसेंबर २०२५) रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. या दोन दिवसीय उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. एकूण १,२०० अर्जदारांना बोलावण्यात आले होते, त्यापैकी ७८६ अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडल्या.
या तक्रार निवारण दिनात ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करत तब्बल ७०७ अर्जांची अर्जदारांच्या समक्ष निर्गती करण्यात आली. उर्वरित अर्जदारांनाही बोलावून त्यांची शंका निरसन व योग्य तो पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नागरिकांना प्रत्यक्ष बोलावून त्यांच्या तक्रारी ऐकून जागेवरच निर्णय व कार्यवाही करण्यात आल्याने अर्जदारांमध्ये समाधानाचे वातावरण होते. अनेक नागरिकांनी ठाणे शहर पोलीसांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत विशेष आभार मानले.
या उपक्रमामुळे पोलीस व नागरिकांमधील संवाद अधिक दृढ झाला असून १०० दिवसांचा कृती आराखडा प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे, असे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी, पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर यांनी सांगितले.