समाजमाध्यमावर तरुणीची बदनामी करून एआय तंत्रज्ञान वापरणारा आरोपी अटकेत
नेरळ पोलिसांची धडक कारवाई; दोन वर्षांपासून सुरू होता मानसिक छळ
पोलीस महानगर नेटवर्क
नेरळ : एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा गैरवापर करत एका तरुणीचे बनावट लग्नाचे फोटो तयार करून ते समाजमाध्यमावर व्हायरल करत तिची बदनामी करणाऱ्या तंत्रशिक्षित तरुणाला नेरळ पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. ही घटना नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
पीडित तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून खोटी माहिती, फोटो आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट केला जात होता. या प्रकारामुळे तरुणीला मानसिक त्रास सहन करावा लागत होता. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सायबर पोलिसांच्या सहकार्याने तांत्रिक तपास सुरू करण्यात आला. संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटचा आयपी अॅड्रेस आणि वापरलेले उपकरण शोधून काढण्यात आले. तपासाअंती आरोपी रायगड जिल्ह्यातील महाड येथून सापडला. पोलीस हवालदार सचिन वाघमारे आणि विनोद वागणेकर यांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीचे नाव प्रसाद जगन्नाथ वास्ते (रा. मूळ – सोलापूर, सध्या – महाड) असे निष्पन्न झाले. तो उच्चशिक्षित असून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तो संगणक क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा सराव करत होता. धक्कादायक बाब म्हणजे तो गेल्या दोन वर्षांपासून पीडित तरुणीची सातत्याने बदनामी करत होता. एवढेच नव्हे, तर तिच्या कुटुंबातील तीन सदस्यांच्या नावानेही बनावट अकाउंट तयार करून पोस्ट टाकत होता.
या प्रकरणी आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय दंड संहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले करत आहेत.
दरम्यान, नेरळ पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, एआयच्या माध्यमातून तयार होणाऱ्या संशयास्पद फोटो व व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये तसेच अशा प्रकारांची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी.