सहा महिन्यांच्या प्रेम विवाहानंतर संसारातील सततच्या मानसिक ताणाला कंटाळून २८ वर्षीय व्यापाऱ्याची रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – रायगडच्या श्रीवर्धन येथील व्यापारी नरेश सखाराम चौधरी (२८) यांनी अवघ्या सहा महिन्यांच्या प्रेम विवाहानंतर संसारातील सततच्या मानसिक ताणाला कंटाळून वडोद्यातील रेल्वे ट्रॅकवर ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नरेश सखाराम चौधरी हे व्यापारी रायगडमधील श्रीवर्धन येथे राहत होते. सहा महिन्यापूर्वी त्यांच्या लक्ष्मी चौधरी हिच्या सोबत प्रेम विवाह झाला होता. संसार सुखाचा नांदावा ही नरेश यांची इच्छा असताना त्यांच्या पत्नीने व सासरच्या माणसांनी त्याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ बनवत केला.
३ डिसेंबर रोजी नरेश यांचे मेहुणे श्रीवर्धन येथे तिच्या बहिणीला भेटायला आले. यानंतर नरेश आणि त्याची बायको लक्ष्मी यांना सासू आजारी आहे, तुम्ही दोघेही वडोदाला चला. या बहाण्याने घेऊन गेले. मात्र, तिथे पोहोचल्यावर वेगळंच घडलं. ४ डिसेंबरला सकाळी ४ वाजता जेव्हा नरेश, त्यांची पत्नी आणि मेहुणे वडोदा स्टेशनला उतरले, तेव्हा त्यांच्या मेहुण्याने त्यांना घरी घेऊन जाण्यास नकार दिला.यानंतर एका जवळच्या हॉटेलच्या रूममध्ये त्यांना डांबून ठेवले. यानंतर चिडलेल्या नरेश यांनी सासरच्या जाचाला कंटाळून वडोदा येथील फलाट नंबर ७ च्या ट्रॅकवर ट्रेन खाली आत्महत्या केली. यामध्ये नरेश यांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या सहा महिन्यातच नरेश यांचा संसार उध्वस्त झाला. या प्रकरणात वडोदा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.