नळ चालू ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून डोंबिवलीत सुरक्षारक्षकाची धारदार शस्त्राने हत्या; आरोपी तरुणाला बेड्या

Spread the love

नळ चालू ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून डोंबिवलीत सुरक्षारक्षकाची धारदार शस्त्राने हत्या; आरोपी तरुणाला बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

डोंबिवली – सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचा संयम किती सुटत चालला आहे, याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. नळ चालू ठेवून पाणी वाया का घालवतोस, असा जाब विचारल्याच्या कारणावरून एका तरुणाने सुरक्षारक्षकाची धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या केली. या घटनेमुळे डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरातील अण्णाभाऊ साठेनगर येथे ही रक्ताळलेली घटना घडली. उमेश वाघ (३५) हे परिसरात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी परिसरात नळ चालू असल्याने पाणी वाया जात होते. हे पाहून उमेश वाघ यांनी तेथील तरुण अक्षय जाधव (३०) याला नळ चालू ठेवण्याबाबत विचारणा केली आणि पाणी वाया घालवू नकोस असे बजावले. मात्र, हा साधा संवाद अक्षयला इतका जिव्हारी लागला की दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली.

वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. रागाच्या भरात अक्षयने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने उमेश वाघ यांच्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात उमेश गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. एका क्षुल्लक कारणावरून एका कष्टाळू व्यक्तीचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवत आरोपी अक्षय जाधव याला काही तासांतच ताब्यात घेतले. अक्षयवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon