अंबरनाथमध्ये सव्वाचार कोटींचे चरस जप्त; दोघांना अटक
आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठी कारवाई; आरोपींना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
पोलीस महानगर नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे सव्वाचार कोटी रुपये किमतीचे चरस जप्त केले असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या दोघांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ परिसरात चरस विक्रीसाठी आणले जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकत मोठ्या प्रमाणात चरस जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे सव्वाचार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी हर्षल पटेल (रा. गुजरात) याला अटक केली. तो गेल्या दीड महिन्यांपासून अंबरनाथ परिसरात वास्तव्यास होता. तसेच त्याचा साथीदार सिराजुद्दीन अहमद यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकरणामागे मोठी अंमली पदार्थांची टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अधिक चौकशी करून या टोळीपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.