क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील अभिनेत्रीने ६० वर्षीय व्यक्तीची सातव्यांदा केली फसवणूक; १.१७ कोटी रुपये लुबाडले
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – क्योंकि सास भी कभी बहू थी’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मसुमी मेवावाला सध्या चर्चेत आहे. मसुमी मेवावालाने ६० वर्षीय व्यक्तीची सातव्यांदा फसवणूक केली आहे. तसेच बनावट कागदपत्रे तयार करण्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला आहे. बांगूर नगर पोलिसांनी ६० वर्षीय व्यक्तीला समोसा-वडापाव फ्रँचायझी योजनेतून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून १.१७ कोटी रुपये लुबाडल्याप्रकरणी अभिनेत्री मसुमी मेवावाला आणि इतर दोन जणांना अटक केली आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतील अभिनेत्री मसुमी मेवावाला यांच्यावर सातव्यांदा बनावटगीरीचा आरोप झाला आहे.
संबंधित ज्येष्ठ नागरिक तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे गेले तेव्हा ही बाब उघडकीस आली. “माझ्या पतीला अटक होऊन त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. २०२२ मध्ये मी पतीला भेटायला जेलमध्ये गेले असता त्याने माझी ओळख राजेश मेवावाला यांच्याशी करून दिली. आठवड्याच्या भेटीदरम्यान मेवावालांनी मला त्यांच्या पत्नी राक्षी, मुलगी मसुमी आणि मुलगा भार्गव यांची ओळख करून दिली. त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे एक चांगली गुंतवणूक योजना आहे,” असे तक्रारदाराने सांगितले.
मुलगी आणि मुलगा तक्रारदाराच्या घरी जाऊन योजनेबद्दल बोलले. “ते माझ्या घरी आले आणि त्यांनी सांगितले की त्यांचा एक खाजगी फूड चेन व्यवसाय आहे आणि ते समोसा-वडापाव पुरवतात. मी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केली तर मला दररोज नफा मिळेल. त्यांच्या आमिषाला भुलून मी २०२२ मध्ये २५ लाख रुपये गुंतवले”, असे तक्रारदाराने सांगितले.तक्रारदाराला सुरुवातीला नफा मिळाला. “ही त्यांची कार्यपद्धती आहे. हे कुटुंब दररोज दोन हजार रुपये नफ्याच्या स्वरूपात जमा करत असे. त्यातून पीडित व्यक्तीला आणखी गुंतवणूक करायला प्रवृत्त केले जाई. त्यानंतर पीडिताने एकूण १.१७ कोटी रुपये गुंतवले. कुटुंबाने नंतर पैसे देणे बंद केले आणि फोन बंद केले,” असे पोलीस म्हणाले.
२०२३ मध्ये राजेश मेवावाला यांना जामीन मिळाला. “जामीन मिळाल्यावर ते माझ्या घरी आले आणि म्हणाले की मसुमी आणि भार्गव यांनी पैसे घेतले आहेत. पण त्यासाठी कुठलेही करारनामे नाही. करार झाला की सर्वांना पैसे परत मिळतील, असे त्यांनी सांगितले. २०२४ मध्ये आम्ही सर्व पीडितांनी राजेश यांच्यासोबत कर्ज करार केला. मात्र आम्हाला काहीच पैसे मिळाले नाहीत आणि शेवटी पोलिसांकडे जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही,” असे त्या ६० वर्षीय महिलेने सांगितले.
पोलिसांच्या मते, मेवावाला कुटुंबाचे लक्ष्य प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक असत. “ते प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, विशेषतः महिलांना लक्ष्य करत. शहरात सात गुन्हे राजेश आणि मसुमी यांच्याविरुद्ध नोंदवले गेले आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत,” असे पोलिसांनी सांगितले.मेवावाला कुटुंबाला २८ नोव्हेंबरला परळमधून अटक करण्यात आली. राजेश मेवावाला (५५), भार्गव मेवावाला (२३) आणि मसुमी मेवावाला (३३) यांच्यावर महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स इन फायनान्शिअल एस्टॅब्लिशमेंट्स एक्ट, १९९९ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.