बेलापूर गावात १४३ ग्रॅम प्रतिबंधित ड्रग्स जप्त; कोट्यवधींची खेप, आरोपी अद्याप अज्ञात
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने बुधवारी मध्यरात्री बेलापूर गावातील कब्रस्तानासमोरील परिसरात छापा टाकून १४३ ग्रॅम अत्यंत महागड्या व प्रतिबंधित अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या ड्रग्सची बाजारातील किंमत कोट्यवधी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून विविध प्रकारचे नशेचे पदार्थ या छाप्यात पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र, या कारवाईनंतर २४ तासांपेक्षा अधिक वेळ उलटूनही पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक झाली की नाही, अटक झाली असल्यास किती जणांना, ड्रग्सचा नेमका स्रोत काय आणि हे रॅकेट कोणत्या स्तरापर्यंत पोहोचले आहे, याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य करण्यात आलेले नाही. पोलिसांकडून मिळणारी “तपास सुरू आहे” एवढीच प्रतिक्रिया नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ठरत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही खेप आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीच्या रॅकेटशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अँटी नार्कोटिक्स सेलने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.
दरम्यान, बेलापूर गाव व परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “कब्रस्तानाजवळ रात्री-अपरात्री एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा सापडतो, म्हणजे हे धंदे किती दिवसांपासून सुरू असतील?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. “आमची मुले सुरक्षित आहेत का?” अशीही चिंता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांत नवी मुंबईत ड्रग्सविरोधी कारवाया वाढल्या असल्या, तरी बहुतांश वेळा केवळ खेप जप्त करून मुख्य सूत्रधार मोकाट राहतात, असा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
एवढ्या घटना घडूनही मुख्य आरोपी अद्याप मोकाट का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी तातडीने पारदर्शक भूमिका घ्यावी आणि नागरिकांची संभ्रमावस्था दूर करण्यासाठी संपूर्ण माहिती जाहीर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.