सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक; ३१ डिसेंबरनंतर पदभार स्वीकारणार

Spread the love

सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक; ३१ डिसेंबरनंतर पदभार स्वीकारणार

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी (डीजीपी) वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या ३१ डिसेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या निवृत्तीनंतर दाते पदभार स्वीकारतील. दाते यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ पर्यंत असणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे.

राज्याच्या गृह विभागाने पोलिस महासंचालकपदासाठी ७ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली होती. त्यामध्ये सदानंद दाते यांचे नाव अग्रक्रमांकावर होते. अखेर यूपीएससीने त्यांच्या निवडीला हिरवा कंदील दिल्याची विश्वसनीय माहिती आहे.

१९९० बॅचचे कर्तव्यनिष्ठ अधिकारी

सदानंद दाते हे १९९० बॅचचे आयपीएस अधिकारी असून, ते कडक शिस्त, प्रामाणिक प्रशासन आणि धाडसी कारवायांसाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात आर्थिक गुन्हे शाखा, सायबर गुन्हे विभाग, रेल्वे पोलिस, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासह विविध महत्त्वाच्या पदांवर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

सध्या ते राष्ट्रीय तपास यंत्रणाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्लॅक कॅट कमांडोंनी अनेक मोठ्या दहशतवादी कारवाया यशस्वीरीत्या उधळून लावल्या आहेत.

२६/११ च्या हल्ल्यात दाखवले होते शौर्य

मुंबईवरील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यावेळी सदानंद दाते यांनी दाखवलेले शौर्य आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्या वेळी ते मुंबई क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत होते. कामा रुग्णालयात घुसलेल्या दोन दहशतवाद्यांचा त्यांनी मोजक्या पोलिसांच्या मदतीने प्रतिकार केला. या धाडसी कारवाईदरम्यान त्यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. मात्र त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक निरपराध नागरिकांचे प्राण वाचले.

यूपीएससीकडे पाठवण्यात आलेली ७ नावे

राज्य सरकारने यूपीएससीकडे पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पाठवली होती—

१. सदानंद दाते – महासंचालक, एनआयए
२. संजय वर्मा – डीजीपी (कायदा व तंत्रज्ञान)
३. रितेश कुमार – कमांडंट जनरल, होमगार्ड्स
४. संजीव कुमार सिंघल – डीजीपी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
५. अर्चना त्यागी – महासंचालक, राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ
६. नागरी सुरक्षा महासंचालक
७. एक अन्य वरिष्ठ आयपीएस अधिकारी

या सर्वांमधून सदानंद दाते यांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

धाडसी, शिस्तप्रिय आणि अनुभवी प्रशासक अशी ओळख असलेल्या सदानंद दाते यांच्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेची धुरा सोपवली जाणार आहे. त्यांच्या नियुक्तीकडे राज्यभरात मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon