८ वर्षांच्या नात्यानंतर प्रेमात फसवणूक; सोलापुरात तृतीयपंथीयाची आत्महत्या, व्हिडीओ व्हायरल
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बाळे गावात प्रेमात धोका मिळाल्याने एका तृतीयपंथीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी संबंधित व्यक्तीने आपली व्यथा मांडणारा व्हिडीओ तयार केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रकाश कोळी (रा. बाळे) असे आत्महत्या केलेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. प्रकाश कोळी आणि सुजित जमादार या तरुणामध्ये गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकत्र राहत होते. मात्र, अलीकडे सुजित जमादारचे एका तरुणीसोबत लग्न ठरले होते. काही दिवसांतच हे लग्न होणार असल्याची बाब समोर आल्यानंतर प्रकाश कोळी नैराश्यात गेला होता.
आपली फसवणूक झाल्याची भावना व्यक्त करत प्रकाश कोळीने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने प्रेमात मिळालेल्या धोका आणि मानसिक वेदना उघडपणे मांडल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकाश कोळीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात तृतीयपंथीयांनी मोठी गर्दी केली असून वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आत्महत्येमागील नेमकी कारणे आणि व्हिडीओतील मजकुराच्या आधारे संबंधित व्यक्तींविरोधात पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.