ठाणे वाहतूक पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान; १६० शाळांमध्ये वाहतूक नियम, सायबर सुरक्षा व अंमली पदार्थांविरोधात मार्गदर्शन
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ठाणे वाहतूक विभागाच्या वतीने जिल्ह्यातील तब्बल १६० विद्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन, सायबर सुरक्षेची जागरूकता तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
या जनजागृती मोहिमेत वाहतूक नियमांचे पालन का आवश्यक आहे, हेल्मेट व सीटबेल्टचे महत्त्व, सुरक्षित वाहनचालन, मोबाईलचा वापर टाळण्याचे दुष्परिणाम यासह सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरील धोके याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान यावरही भर देण्यात आला.
विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि संदेश प्रभावीपणे पोहोचावा यासाठी पथनाट्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांनी स्वतः सादरीकरणातून समाजात सकारात्मक संदेश देण्याची भूमिका बजावली. ठाणे वाहतूक पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून कौतुक होत आहे.