धक्कादायक! वसईत लव्ह व डेटिंग ॲपच्या नावाखाली हनीट्रॅप रॅकेटचा पर्दाफाश
ऑनलाइन मैत्री, भेटीचे आमिष आणि ड्रिंक्समध्ये ड्रग्ज देऊन लाखोंची लूट
पोलीस महानगर नेटवर्क
पालघर -वसई – ऑनलाइन डेटिंगच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून ड्रग्ज देऊन बेशुद्ध करत लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या हनीट्रॅप रॅकेटचा वसई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबईतील दोन भामट्या महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांडवी येथील ३१ वर्षीय युवकाची ओळख ‘Happn’ या डेटिंग ॲपवर एका महिलेशी झाली. ऑनलाइन चॅटिंगदरम्यान महिला गोड बोलू लागली आणि २२ नोव्हेंबर रोजी वसईतील एका लॉजमध्ये भेटण्याचे आमिष तिने दाखवले. मात्र, ठरलेल्या दिवशी महिला एकटी न येता तिच्यासोबत आणखी एक साथीदार घेऊन आली.
दोन्ही महिलांनी तरुणाला बोलण्यात गुंतवून त्याच्यासोबत मद्यपान केले. काही वेळातच तरुण बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी त्याला शुद्धीवर आल्यानंतर गळ्यातील सोन्याची चैन, महागडा मोबाईल फोन आणि स्मार्टवॉच असा एकूण १ लाख ८३ हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले. तत्सम स्वरूपाचा आणखी एक गुन्हा २३ नोव्हेंबर रोजी नोंदवला गेला असून पीडिताने काशिमिरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास केला. फेक प्रोफाइल तयार करणे, धूसर फोटो वापरणे, खोटे तपशील, फेक नंबरद्वारे संपर्क आणि प्रत्येक गुन्ह्यानंतर प्रोफाइल तत्काळ डिलीट करण्याची पद्धत अशा अत्यंत शिताफीने ते काम करत असल्याचे आढळले. मात्र सीसीटीव्ही फूटेजमधून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोन्ही महिलांचा ठावठिकाणा शोधला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनात पथकाने अवघ्या दोन दिवसांत आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. दोघांकडून ४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आणखी किती जणांची लूट झाली आहे आणि या रॅकेटमध्ये इतरांचीही सहभागिता आहे का, याचा तपास सुरू आहे.
ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मद्वारे वाढत चाललेल्या हनीट्रॅपच्या घटनांबाबत पोलिसांनी इशारा दिला आहे. अनोळखी व्यक्तींवर त्वरित विश्वास न ठेवणे, एकांत ठिकाणी पहिली भेट टाळणे आणि स्वतःची सुरक्षा प्रथम राखण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.