चांदवडमध्ये ‘ईव्हीएम सेटिंग’ ऑफरचा धक्कादायक आरोप; एक कोटींच्या मागणीप्रकरणी गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
चांदवड – नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर चांदवडमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करून मते मिळवून देण्याच्या कथित ऑफरने खळबळ उडाली आहे. नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांनी एका व्यक्तीने एक कोटी रुपयांच्या बदल्यात ११,२५० मते मिळवून देण्याची ऑफर दिल्याचा दावा केला असून, याप्रकरणी चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही तक्रार नोंदविण्यात आली आहे.
घटनेनंतर नागरिकांमध्ये ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत तसेच निवडणूक प्रक्रियेवर विविध चर्चांना उधाण आले आहे.
उमेदवार राकेश अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.५५ वाजता त्यांच्या मोबाईलवर (८३९०२५११४७) शक्ति विलास ढोमसे या व्यक्तीचा फोन आला. संभाषणात ढोमसे यांनी भाजप उमेदवार वैभव बागुल यांना निवडणुकीत १३,६४२ मते मिळणार असल्याची खात्री व्यक्त केली. आहिरे यांनी ही आकडेवारी कशी निश्चित असल्याची विचारणा केली असता, “माझं ईव्हीएम मशीन वाल्यांशी बोलणं झालं आहे,” असा धक्कादायक दावा ढोमसे यांनी केला, असे नमूद आहे.
यानंतर त्यांनी एक कोटी रुपये दिल्यास ११,२५० मते मिळवून देण्याची खुली ऑफर दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संदर्भातील फोन रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे पेनड्राईव्हमध्ये जोडल्याचेही आहिरे यांनी नमूद केले आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या प्रकरणात प्रतिक्रिया विचारल्यावर शक्ति ढोमसे यांनी, “आहिरे यांनी केलेले सर्व आरोप निराधार आहेत,” असा दावा केला. चांदवड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आल्याने स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, निवडणूक प्रक्रियेबाबत नव्या चर्चांना सुरूवात झाली आहे.