मोबाईलच्या रिंगवरून उलगडा; डोंबिवलीत कोळेगावात बिगारी कामगाराच्या पत्नीचा खून
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – कोळेगावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत बिगारी कामगाराच्या पत्नीचा निर्घृण खून झाल्याचा उलगडा मोबाईल फोनच्या रिंगमुळे झाला. दरवाजा बाहेरून कुलूपबंद असताना घराच्या आतून महिलेचा मोबाईल वाजत असल्याचे लक्षात येताच तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला.
कोळेगावातील भावदेवीनगर येथे राहणाऱ्या रिक्षाचालक वासुदेव दिवाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोपट दिलीप दाहिजे (३९) या महिलेच्या पतीविरोधात खुनाचा गुन्हा मानपाडा पोलिसांनी दाखल केला आहे. पोपट दहिजे हा स्थानिक विकास प्रकल्पात बिगारी कामगार म्हणून कार्यरत असून घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
रिक्षाचालक वासुदेव दिवाणे यांनी घरगुती कामासाठी पोपट दहिजे याला बोलावले होते. कामावर येण्याचे आश्वासन देऊनही पोपट अर्ध्या दिवसानंतरही आला नाही. मोबाईल बंद येत असल्याने वासुदेव दिवाणे व बाळासाहेब म्हस्के हे दोघे कोळेगावातील कृष्णाईनगर परिसरातील पोपटच्या घरी गेले. घराला बाहेरून कुलूप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दोघांनी पोपटला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर बाळासाहेब यांनी पोपटची पत्नी ज्योतीच्या मोबाईलवर कॉल केला असता तिचा फोन घराच्या आतूनच वाजत असल्याचे ऐकू आले. पत्नी घरातच असावी असा अंदाज घेऊन वासुदेव यांनी खिडकीतून आत डोकावले असता फरशीवर रक्त आणि त्याच्याजवळ ज्योती दहिजे हिचा मृतदेह दिसला.
शेजाऱ्यांच्या मदतीने घराचे कुलूप तोडण्यात आले. आत प्रवेश केल्यावर ज्योतीचा ओढणीने गळा आवळून आणि धारदार वस्तूने वार करून खून झाल्याचे स्पष्ट झाले. खून केल्यानंतर पोपट दहिजे घटनास्थळावरून फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मानपाडा पोलीस निरीक्षक मनीषा वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.