नागपुरात प्रेमसंबंधातून रक्तरंजित हल्ला; माजी प्रियकरासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर : गर्लफ्रेण्डने अबोला धरल्याच्या रागातून आणि ती दुसऱ्या तरुणाशी बोलू लागल्याच्या संतापातून माजी प्रियकराने साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. केडीके कॉलेज रोडवर सोमवारी उशिरा रात्री हा थरार उडाला.
या प्रकरणात पोलिसांनी नॅव्ही (२१) या जखमी तरुणाच्या तक्रारीवरून संकेत वंजारी (२४), वैभव तान्नेलवार आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा नोंदवला आहे. नॅव्ही हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून आरोपी संकेत त्याच भागात राहतो. पीडित नॅव्हीसोबत संवाद साधू लागल्यामुळे सहा महिन्यांपासून अबोला धरणाऱ्या रियाच्या (नाव बदललेले) वागण्याचा संकेतला राग होता.
घटनेच्या रात्री नॅव्ही व रिया फोनवर बोलत असताना संकेतने रियाला कॉल केला. रियाने दोघांना कॉन्फरन्सवर घेतले असता संकेतने नॅव्हीला शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्याच वेळी वैभवनेही नॅव्हीला फोन करून ‘मर्डर’ची धमकी दिली. त्यानंतर नॅव्ही आपल्या मित्रांसह केडीके कॉलेज रोडवरील झिलपे डेकोरेशनजवळ थांबला.
काही वेळातच संकेत आणि त्याचे दोन साथीदार मोटारसायकलवरून तिथे दाखल झाले आणि त्यांनी नॅव्हीवर हल्ला चढवला. त्यानंतर वैभवही आला. त्याने मारहाण केल्यानंतर खिशातील चाकू काढत संकेतकडे देत, “याला मारून टाक!” अशी चिथावणी दिली. त्यानंतर संकेतने नॅव्हीच्या गळ्यावर चाकूने वार केले. नॅव्हीला मदत करण्यासाठी धावलेल्या मित्र राज आणि अंशुल यांनाही आरोपींनी मारहाण केली.
नॅव्हीच्या आरडाओरडाने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांची चाहूल लागताच चारही आरोपी पसार झाले. जखमी नॅव्हीला मित्रांनी नंदनवन पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पाहणी करून नंदनवन पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून प्रेमसंबंधातून उफाळलेल्या या हल्ल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.