घाटकोपर एसआरए घोटाळा प्रकरण; रमाबाई आंबेडकर नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर उपोषण सुरू, ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
रवि निषाद / मुंबई

मुंबई – घाटकोपर पूर्व येथील कामराज नगरातील एसआरए पुनर्विकास प्रकल्पात तब्बल ५०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत रमाबाई आंबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर उपोषणाला सुरुवात झाली आहे. संविधान दिनापासून हे उपोषण सुरू असून परिसरातील आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणावर या आंदोलनास पाठिंबा देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलम फायनान्स प्रा. लि. या कंपनीमार्फत झालेल्या कामराज नगर एसआरए योजनेत ४९२ रहिवाशांना ३०० चौ.फुटांच्या घराचे कागदपत्र दाखवून प्रत्यक्षात फक्त २६९ चौ.फुटांचे घर देण्यात आले. या फरकातून सुमारे १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
याशिवाय ॐ साई गणेश संस्था अंतर्गत असलेल्या १७,२७० चौ.मीटर प्लॉटचे क्षेत्रफळ एसआरए अधिकारी, नगर भू-मापन विभागातील अधिकारी आणि विकासक यांच्या संगनमताने २०,३७० चौ.मीटर दाखवून अतिरिक्त ३,००० चौ.मीटर क्षेत्राचा अवैध लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अतिरिक्त क्षेत्रातून जवळपास १ लाख चौ.फुट विकास हक्क निर्माण होऊन ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले जाते.
या संपूर्ण प्रकरणात एकूण अंदाजे ५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या घोटाळ्याच्या विरोधात आरपीआय (आठवले गट) चे वार्ड क्र. १२५ अध्यक्ष रवि नेटावटे, समाजसेवक अनिल मोरे आणि इतर नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सुरू असलेल्या या आंदोलनास स्थानिक आंबेडकरी समाजाकडून मोठे समर्थन मिळत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई आणि घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी तीव्र होत आहे.