कल्याणमध्ये अल्पवयीन मुलांना विनाअनुमती प्रवेश; ‘जॉयस्टिक जंगल’ गेम झोनवर पोलिसांची कारवाई

Spread the love

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलांना विनाअनुमती प्रवेश; ‘जॉयस्टिक जंगल’ गेम झोनवर पोलिसांची कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – कोळसेवाडी परिसरातील चिंचपाडा रोडवरील ‘जॉयस्टिक जंगल’ नावाच्या गेम झोनवर अल्पवयीन मुलांना विनाअनुमती प्रवेश देणे तसेच कोणत्याही सुरक्षाविषयक नियमांचे पालन न केल्यामुळे कोळसेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

२५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १ वाजता प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश न्हायदे, सपोनि दर्शन पाटील व पथकाने सदर गेम झोनवर छापा टाकला. रितेश इम्पायर इमारतीतील गाळा क्रमांक ११ व १२ मध्ये चालणाऱ्या या गेम झोनमध्ये तपासणीदरम्यान १८ वर्षांखालील अनेक मुले–मुली आठ संगणकांवर गेम खेळताना आढळून आली.

तपासात पुढे उघड झाले की, गेम झोनच्या भूयारी (ग्राउंड फ्लोअर) भागात एक बंद प्रायव्हेट रूम असून तेथे प्रकाशव्यवस्था, हवेशीरपणा (व्हेंटीलेशन), अग्निसुरक्षा उपकरणे, सीसीटीव्ही कॅमेरे अशा अनिवार्य सुरक्षोपायांचा पूर्णत: अभाव होता. नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेली ही व्यवस्था मुलांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारी असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

या प्रकरणी गेम झोनचे मालक पृथ्वीराज राजा चव्हाण (२७), श्रीराम राजा चव्हाण (२५) आणि चालक अमित उदाराम सोनवणे (२०) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हा क्र. ८४०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२५, ३(५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३१, १३३ अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गेमिंग झोनवर कायम कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पालकांनीही मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवून सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon