नौपाडा पोलीस ठाण्याचा वेगवान तपास; प्रवाशाची हरवलेली बॅग परत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : नौपाडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने हरवलेली मौल्यवान बॅग शोधून काढत एक कौतुकास्पद उदाहरण घातले आहे. तक्रारदार सुभाष बळीराम कसबे (रा. खडकपाडा, कल्याण) हे २५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता मेंटल हॉस्पिटल–ठाणे स्टेशन या मार्गावर रिक्षाने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या लक्षात न येता त्यांची बॅग रिक्षातच राहिली.
बॅगेमध्ये टॅब, मोबाईल फोन आणि पाच तोळे वजनाचे मंगळसूत्र असा महत्त्वाचा व किमती मुद्देमाल होता. घटनेची तक्रार मिळताच नौपाडा पोलिसांनी तांत्रिक तपासाची मदत घेत रिक्षाचा नंबर शोधून काढला. तपास पथकाने संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेत बॅगमधील सर्व मुद्देमाल सुरक्षित अवस्थेत परत मिळवला.
सदर मुद्देमाल तक्रारदार कसबे यांना पोलीस ठाण्यात सुपूर्त करण्यात आला. नागरिकांच्या मदतीसाठी जलद कारवाई करण्याची ठाणे पोलिसांची तत्परता आणि जबाबदारी या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाली.