परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्यांची डीजीपी कार्यालयाला भेट; रश्मि शुक्ला यांचे कार्यनिष्ठा व वर्तनाविषयी मार्गदर्शन
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : ७७ आरआर बॅच (२०२४) मधील तब्बल १३ परिविक्षाधीन भारतीय पोलीस सेवा (भा.पो.से.) अधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे सदिच्छा भेट दिली. या नवोदित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी त्यांच्या भावी सेवेसंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या.
या वेळी शुक्ला यांनी भा.पो.से. अधिकाऱ्यांनी सेवेमध्ये अपेक्षित असलेले व्यावसायिक वर्तन, पारदर्शकता, जनसेवा, जबाबदारीची जाणीव आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत काटेकोरपणा याबाबत विशेष मार्गदर्शन केले. तसेच परिविक्षाधीन कालावधीत स्थानिक परिस्थिती, पोलीस यंत्रणेतील विविध शाखांचे कामकाज, तपास पद्धती, तांत्रिक साधनांचा वापर यांची सखोल माहिती आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नवोदित अधिकाऱ्यांनीही आपल्या सेवेत उत्तम कार्यक्षमतेची ग्वाही देत राज्यातील सुरक्षितता आणि नागरिकांच्या विश्वासासाठी निष्ठापूर्वक कार्य करण्याची बांधिलकी व्यक्त केली.