देसाई गाव खाडी पुलाखाली आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचा गुन्हा २४ तासांत उघड; आरोपी अटकेत

Spread the love

देसाई गाव खाडी पुलाखाली आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचा गुन्हा २४ तासांत उघड; आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : देसाई गाव खाडी पुलाखाली ट्रॉली बॅगेत मिळालेल्या अनोळखी महिलेच्या प्रेतामागील धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा ठाणे पोलीसांनी अवघ्या २४ तासांत केला आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (वय ५०, रा. देसाईगाव, मूळ गाव – गोरखपूर, उत्तरप्रदेश) या आरोपीला अटक केली आहे.

२४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.५५ वाजता नियंत्रण कक्षाकडून देसाई गावातून कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील खाडी पुलाखाली संशयास्पद ट्रॉली बॅग आढळल्याची माहिती मिळाली. शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खाडीतील मातीच्या भरावावर पडलेल्या ट्रॉली बॅगेत २०-२५ वर्षीय महिलेचे अर्धवट कुजलेले प्रेत आढळले.

महिलेने गुलाबी रंगाचा टॉप व लाल लेगीन्स परिधान केली होती. तिच्या डाव्या मनगटावर ‘P.V.S.’ असे गोंदणे आढळले. ओळख पटत नसल्याने अज्ञात व्यक्तीने खून करून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकल्याचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेनंतर पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी विशेष पथके तयार केली. याचदरम्यान सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या बातमीच्या आधारे एका साक्षीदाराने मा. अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांच्याशी संपर्क साधला. त्या माहितीवरून मिळालेल्या दिशानिर्देशांनुसार हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तपासताना आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. प्रियांका विश्वकर्मा (वय २२) ही महिला आरोपीसोबत गेल्या पाच वर्षांपासून राहत होती. २१ नोव्हेंबरच्या रात्री किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपीने तिचा गळा दाबून खून केला. दुसऱ्या दिवशीपर्यंत मृतदेह खोलीत ठेवून २२ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता ट्रॉली बॅगेत भरून तो खाडी पुलावरून खाली फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपीने सांगितले.

मयताची ओळख पटवून गुन्हा २४ तासांत उघडकीस आणण्याचे श्रेय शिळ-डायघर पोलीस ठाण्याच्या पथकाला जाते. मा. अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपआयुक्त सुभाषचंद्र बुरसे (परि. १), प्रशांत कदम (परि. ५), तसेच सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक गजेंद्र राऊत व त्यांच्या पथकाने तपासाची गती वाढवली.

या संपूर्ण तपासात सपोनि संतोष चव्हाण, अनिल राजपुत, योगेश लामखडे, शहाजी शेळके, अमोल पोवार, तसेच पोलीस कर्मचारी श्यामकुमार राठोड, हनुमंत मोरे, भरत जाधव, तेजस परब, विश्वास मोटे, महेंद्र लिंगाळे आदींचा समावेश असलेल्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

ठाणे पोलीस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी ही माहिती प्रसिद्धीस दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon