कर्ज घेऊन सीबील वाढवून देण्याचे आश्वासन देत रत्नागिरीतील महिलेची डोंबिवलीत ७.७९ लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – कर्ज मिळवून देतो, सीबील स्कोअर वाढवून देतो अशा आमिषांना बळी पडल्यामुळे रत्नागिरीतील एका महिलेची तब्बल ७ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुपर्णा अंकुश ढेपे (३४) असे तक्रारदार महिलेचे नाव असून त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सुपर्णा या घर बांधण्यासाठी दहा लाखांचे कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात होत्या. या दरम्यान त्यांची ओळख अनिल गुप्ता या व्यक्तीशी झाली. गुप्ताने डोंबिवलीत कर्जाची सोय करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर मार्च महिन्यात तो सुपर्णा यांना डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रोडवरील लिज्जत पापडसमोरील एका शोरूममध्ये घेऊन आला. येथे समीर बोस, सुशांत गोवीकर आणि किसन पोपट या तिघांनी तिला कर्ज मिळवण्यासाठी सीबील वाढवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
याच आमिषाला भुलून सुपर्णा यांनी आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे दिली. त्यानंतर तिघांनी तिच्या नावे चार दुचाकींसाठी ३.६१ लाखांचे आणि मोबाईल खरेदीसाठी ४.१७ लाखांचे असे एकूण सात लाख ७९ हजारांचे कर्ज काढून घेतले. सुरुवातीचे काही हप्ते आरोपींकडून भरले गेले, मात्र जुलैपासून त्यांनी हप्ते भरणे बंद केले. परिणामी बँकेचे अधिकारी थेट रत्नागिरीत सुपर्णा यांच्या घरी पोहोचले.
परिस्थितीच्या चौकशीसाठी सुपर्णा पुन्हा डोंबिवलीत आल्या असता संबंधित शोरूम बंद असल्याचे आणि आरोपी चार दुचाकी व मोबाईल विकून फरार झाल्याचे स्पष्ट झाले. सोन्याचे दागिने विकून व नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन काही रक्कम भरल्यानंतर फसवणुकीची संपूर्ण माहिती बाहेर आली.
आपला विश्वास संपादन करून कर्जाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक केल्याची तक्रार सुपर्णा ढेपे यांनी नोंदवली असून विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.