माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन; घाटकोपरातील विकासकामांबाबत महत्त्वाच्या मागण्या
रवि निषाद / मुंबई
मुंबई – माजी गृहनिर्माण मंत्री आणि घाटकोपरचे ज्येष्ठ नेते प्रकाश मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन घाटकोपर परिसरातील महत्त्वाच्या प्रलंबित विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी सविस्तर निवेदन देत तीन प्रमुख मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष देण्याची विनंती केली.
निवेदनात मेहता यांनी घाटकोपर (पश्चिम) सी.जी.एस. कॉलनीतील केंद्र सरकारच्या मोकळ्या भूखंडावर AIIMS रुग्णालय उभारावे, अशी मागणी केली आहे. मुंबईकरांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी हा प्रकल्प अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच घाटकोपर (पूर्व) अष्टविनायक गृहनिर्माण संस्थेच्या क्लस्टर योजनेत मिळणाऱ्या पीटीसी निवासी गाळ्यांमध्ये संजय गांधी नगर, पटेल चाळ, गणेश नगर अशा टाटा ओव्हरहेड वायरखालील आणि मुख्य नाल्यालगतच्या झोपड्यांना समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, पंतनगर येथील इमारत क्रमांक ९१ शेजारील आर-७ भूखंडावरील म्हाडाच्या दहा माजी कर्मचारी/वारसांना हक्काचे घर मिळावे यासाठी भारानी डेव्हलपर्सकडून त्रिपक्षीय करार करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशीही विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. विकासक करारास टाळाटाळ करत असल्याने म्हाडाने हस्तक्षेप करून करार पूर्ण करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनात नमूद केली आहे.
या तिन्ही विषयांकडे मुख्यमंत्री सकारात्मक दृष्टीकोनातून लक्ष देऊन योग्य ती पावले उचलतील, अशी अपेक्षा स्थानिकांतून व्यक्त होत आहे.