कल्याण -डोंबिवली महानगरपालिका नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यावर भडकले खासदार बाळ्या मामा; थेट सरळ करण्याची ताकिद
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका नगररचना विभागाचे अधिकारी सुरेंद्र टेंगळे यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळ्या मामा चांगलेच संतापले. टेंगळे पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर संतप्त खासदारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना त्याला मारण्याची भाषा वापरली. सामान्य नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने खासदार म्हात्रे यांनी आयुक्तांकडे दाद मागितली आहे, तसेच लेखी तक्रार आल्यास त्याला ‘सरळ’ करण्याची धमकी दिली आहे.
केडीएमसी अधिकारी सुरेंद्र टेंगळे यांच्या कार्यपद्धतीमुळे सामान्य नागरिकांची कामे खोळंबत असल्याची तक्रार खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्याकडे वारंवार येत होती. संतप्त झालेल्या खासदारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना यावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “सर्वसामान्य माणूस लवकर तक्रार करत नाही. जेव्हा विषय डोक्यावरून जातो, तेव्हाच तो तक्रार करतो. आता जर लेखी तक्रार आली, तर मी टेंगळेला त्याच्या ऑफिसमध्ये घुसून त्याचे काम समजावून सांगणार. तुम्ही फक्त लेखी तक्रार द्या, नंतर मी त्याला सरळ करतो.”
काही पत्रकारांनी या संदर्भात खासदारांना विचारणा केली असता, त्यांनी टेंगळे यांच्यावर थेट आरोप केला. खासदार म्हात्रे म्हणाले की, “टेंगळे पैसे घेतल्याशिवाय कोणाचेही काम करत नाही. माझ्याकडे लेखी तक्रार आली तर मी त्याला मारणार.” यापूर्वी नागरिकांनी तक्रार केल्यानंतर टेंगळे यांना थांबायला सांगितले होते, पण ते न थांबता निघून गेल्यामुळेही खासदार अधिक संतप्त झाले होते.
खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी शुक्रवारी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी सुरेंद्र टेंगळे यांच्याविषयी तीव्र संताप व्यक्त केला. याच भेटीत रिंग रोडच्या कामाविषयी तसेच कल्याण पश्चिमेकडील स्टेशन परिसराच्या विकासकामांबाबतही त्यांनी आयुक्तांशी सविस्तर बोलणे केले.
कल्याण पश्चिम स्टेशन परिसराचा विकास ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत सुरू आहे. या विकासकामांमध्ये स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा रस्ते विस्तारीकरणामुळे बाधित झाली आहे. बाधित झालेल्या जागेच्या बदल्यात पालिकेने दिलेली १७ गुंठे जागा अपुरी आहे, असे खासदारांचे म्हणणे आहे. या अपुऱ्या जागेत स्मारक, ग्रंथालय आणि अभ्यासिका विकसित करणे शक्य नाही. त्यासाठी किमान ३७ गुंठे जागा आवश्यक आहे. याकरिता जागेचे सीमांकन करणे आवश्यक असून, त्याचा प्रस्ताव लवकरच आयुक्तांकडे दिला जाणार असल्याचे खासदार म्हात्रे यांनी सांगितले.