जमीन वाटणीच्या वादातून डॉक्टर मुलीचा आपल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला; बोटाचा मोठा तुकडा चावून तोडला

Spread the love

जमीन वाटणीच्या वादातून डॉक्टर मुलीचा आपल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला; बोटाचा मोठा तुकडा चावून तोडला

योगेश पांडे / वार्ताहर

कोल्हापूर – वडिलोपार्जित जमीन वाटणीच्या वादातून पेशाने डॉक्टर असलेल्या मुलीने आपल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केला आहे. दुचाकी घालून लाथाबुक्की केली आणि बोटाचा मोठा तुकडा चावून तोडून टाकल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. गिजवणे गावात ही घटना घडली आहे. कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे गावात झालेल्या या हल्ल्यामध्ये ७८ वर्षीय गणपतराव विष्णू हाळवणकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारांनंतर अधिक उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या प्रकरणात मुलगी डॉ. शुभांगी सुनील निकम (४३) यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपतराव हाळवणकर आणि त्यांच्या दोन मुलींमध्ये मालमत्तेच्या वाटणीसंबंधी वाद गेल्या काही काळापासून सुरू होते. पैशाच्या मुद्द्यावरून ११ आणि १४ नोव्हेंबर रोजी शुभांगीकडून शिवीगाळ करत धमकावण्याचा प्रकार झाल्याची तक्रार देखील गणपतरावांनी केली होती. या पार्श्वभूमीवर देखील हा वाद शांत न होता अजूनच वाढत गेला आणि गणपतराव यांच्यावर जीवघेण्या हल्ल्यात बदलला.

रविवारी सायंकाळी गणपतराव फिरण्यासाठी बाहेर निघाले असता गिजवणे ते गडहिंग्लज रोडवरील पेट्रोलपंपाजवळ त्यांना त्यांच्या मुलीने अडवले. दुचाकीवरून येऊन त्यांच्या अंगावर दुचाकी घातली. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर शुभांगीने आपल्याच वडिलांना शिवीगाळ केली, “माझ्याविरुद्ध तक्रार केली, तर तुला जिवंत सोडणार नाही” असा इशारा दिला. या वेळी तिने डोक्याला, छातीवर लाथा मारल्या आणि हातानेही मारहाण केली.

रागात मारहाण करताना गणपतराव यांनी हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात शुभांगीने आपल्या वडिलांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळच्या तर्जनी बोटाचा जोराचा चावा घेतला. त्यामुळे बोटाचा पुढील भाग तुटून मोठा रक्तस्त्राव झाला. या गंभीर घटनेची माहिती गणपतराव यांनी तात्काळ मुलगा उदय हाळवणकर (३६) याला दिली. उदय यांनी घटनास्थळी पोहोचून वडिलांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापुरात सीपीआर येथे दाखल करण्यात आले. सध्या गणपतराव यांच्यावर उपचार सुरु आहेत.

उदय हाळवणकर यांनी आपल्या बहिणीविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी हवालदार डी. एन. पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. दरम्यान ही घटनेने समाजात मोठी खळबळ उडवून दिली असून, वडिलोपार्जित मालमत्तेतील वादामुळे किती मोठ्या कलहाला तोंड फुटू शकते, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. त्यामुळे प्रकरणाची पुढील कारवाई कशी होईल, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon