धक्कादायक! येरवड्यात महिलेला बेदम मारहाण करून खून; मृतदेह कचरापेटीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : येरवडा परिसरात फिरस्ती महिलेला घरात दांडक्याने बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतदेह घरात दोन ते तीन दिवस ठेवून त्यातून दुर्गंधी सुटू लागताच आरोपींनी तो चादरीत गुंडाळून रिक्षातून लोहगाव-वाघोली रस्त्यावरील कचरापेटीत टाकल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सुवर्णा (वय ४०, पूर्ण नाव माहिती नाही) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून ती फिरस्ती असल्याची माहिती आहे. या प्रकरणी रवी रमेश साबळे (वय ३५) आणि त्याचे वडील रमेश रामचंद्र साबळे (वय ६५, रा. जिजामातानगर, नवी खडकी, येरवडा) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
तपासानुसार, आरोपी रवी साबळे याची सुवर्णाशी पुणे स्टेशन परिसरात ओळख झाली होती. १५ नोव्हेंबर रोजी त्याने तिला आपल्या येरवड्यातील घरी आणले. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. तत्पश्चात रवी आणि त्याचे वडील रमेश यांनी लाकडी दांडक्याने तिची बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झाल्यानंतरही आरोपींनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले नाही. मारहाणीत तिचा मृत्यू झाला.
मृत्यू झाल्यानंतर दोघांनी मृतदेह दोन ते तीन दिवस घरातच ठेवला. दुर्गंधी सुटू लागताच मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतदेह चादरीत गुंडाळून रिक्षातून लोहगाव-वाघोली रस्त्यावरील स्मशानभूमी परिसरातील कचरापेटीत टाकण्यात आला.
मंगळवारी (१८ नोव्हेंबर) कचरापेटीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळताच परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सोमय मुंढे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासात रवी आणि रमेश साबळे यांनीच हा खून करून मृतदेह फेकल्याचे स्पष्ट झाले. दोघेही आरोपी पसार झाले होते, परंतु त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ठाकर करत आहेत.