मुंबईच्या नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार; ३ अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करणारा नराधम अटकेत
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका नामांकित शाळेच्या व्हॅन चालकाने तीन मुलींसोबत अश्लील वर्तन केलं आहे. आरोपीनं पीडित मुलींच्या अंगाला नको तिथे स्पर्श करत लैंगिक चाळे केले आहेत. या प्रकरणी सांताक्रूझ येथील एका महिलेनं आरोपी चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांची मुलगी विलेपार्ले येथील एका नामांकित शाळेत शिक्षण घेते. आरोपी व्हॅनचालक हा शाळेतील मुलींना ने-आण करण्याचं काम करतो. गुरुवारी सायंकाळी आरोपी व्हॅनचालक जुहू येथील शाळेजवळ व्हॅनसह उभा होता. तक्रारदार महिलेच्या मुलीला व्हॅनमध्ये बसवताना त्याने तिच्या छातीला नकोसा स्पर्श करत गैरवर्तन केले.
इतकेच नव्हे, तर त्याच व्हॅनमध्ये असलेल्या तिच्या आठ आणि नऊ वर्षांच्या अन्य दोन मैत्रिणींसोबतही या व्हॅनचालकाने अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग केला. हा संतापजनक आणि गंभीर प्रकार तिन्ही मुलींनी त्यांच्या पालकांना सांगितला. या घटनेमुळे मुलींच्या पालकांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर, तक्रारदार महिलेने तातडीने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि व्हॅनचालकाविरुद्ध सविस्तर तक्रार दाखल केली.
जुहू पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी व्हॅनचालकाविरुद्ध विनयभंगासह ‘पोक्सो’ कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत ४८ वर्षीय व्हॅनचालकाला अटक केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपीनं यापूर्वी अशाप्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का? त्याने इतर मुलींशीही गैरवर्तन केलं आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.