घाटकोपरमधील के. व्हि. के. विद्यालयात वडापाव खाल्ल्याने १५ ते १६ मुलांना विषबाधा; शाळेतील खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मधल्या सुटीमध्ये शाळेच्या उपहारगृहातील वडापाव खाल्ल्याने घाटकोपरमधील के.व्ही.के. विद्यालयातील १५ ते १६ मुलांना विषबाधा झाली. ही मुले साधारणपणे इयत्ता पाचवी ते आठवीतील असून, या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवून त्यांच्यासोबत पाठवण्यात आले आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील श्रेयस सिनेमाजवळ असलेल्या के.व्ही.के. घाटकोपर स्कूलमध्ये सकाळच्या सत्रमाध्ये इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग भरतात. सोमवारी सकाळच्या सत्रातील मधली सुटी झाल्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीमधील काही मुलांनी शाळेच्या उपहारगृहामध्ये वडापाव खाल्ला. हा वडापाव खाल्ल्यानंतर जवळपास १५ ते १६ मुलांना उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी तातडीने जवळील मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांना बोलावले, तसेच मुलांच्या पालकांनाही कळवले.
डॉक्टरांनी तातडीने धाव घेऊन विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केले. तसेच काही पालकांनी त्यांच्या मुलांना घेऊन खासगी रुग्णालयामध्ये धाव घेतली. विषबाधा झालेल्या तीन मुलांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले. या विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले असले तरी त्यांनी रुग्णालयामध्ये दाखल होण्यास नकार दिल्याची माहिती राजावाडी रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली. तसेच चिराग नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. त्यांनी उपहारगृहातील सर्व साहित्य व जेवण बनविण्याचे सामान ताब्यात घेतले असून, कसून चौकशी करत आहेत.
दरम्यान, या प्रकारानंतर पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी शाळेतल्या उपहागृहांमध्ये बनवले जाणारे खाद्यपदार्थ कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शाळेमार्फत विद्यार्थ्यांना दिला जाणारा खाऊ किंवा शाळेतले उपहागृह तिथली स्वच्छता आणि खाद्यपदार्थांचा दर्जा यांची नियमित तपासणी केली जाते की नाही, असाही प्रश्न उभा राहतो आहे. घाटकोपरमध्ये घडलेली ही घटना काय देशातली किंवा राज्यातली पहिली अशा स्वरुपाची घटना नाही आहे. त्यामुळे यानंतर तरी प्रशासन जागरुक होणार का? अशा घटना होऊ नयेत यासाठी काय उपाय योजना करणार? याकडे लक्ष देण्याची गरज आहे.