पीएमओ सचिव असल्यााचे भासवून तोतयागिरी करणाऱ्या इसमाच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपति संभाजिनगर – केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून फुशारक्या मारत फिरणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर यांच्या चतुराईने ही अटक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात हा सगळा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पीएमओ सचिव असल्यााचे भासवून तोतयागिरी करणाऱ्या इसमास व त्याच्या साथीदारास अटक केली आहे.
झालं असं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाळूज एमआयडीसी परिसरातील लग्नसमारंभात उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रम स्थळी पीएमओ सचिव भारत सरकार कार्यालयातील अधिकारी म्हणून एका व्यक्तीचे स्वागतासाठी नाव पुकारण्यात आले. प्रधानमंत्री कार्यालयाचे कोणीही अधिकारी शहरात दौऱ्यावर नसल्याने त्यावेळी बंदोबस्ताच्या ठिकाणी हजर असलेले पोलीस पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर यांना संशय आला.
अधिक चौकशीसाठी त्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याला विचारपूस केली. त्यावेळी त्याने त्याचे नाव अशोक भारत ठोंबरे असे सांगून सुरुवातीला तो निती आयोग भारत सरकार याचा सदस्य असल्याचे सांगितले.परंतु बारकाईने विचारपूस करता त्याच्याकडे तसी कुठलीही ओळख पुरावा मिळून आला नाही.
तो खोटी माहिती देत असल्याचे व लोकसेवक म्हणून तोतयगिरी करत असल्याचे निदर्शनास आले.त्याची झडती घेतली असता, त्याच्या सुटकेसमध्ये एक पांढऱ्या रंगाच्या पाटीवर लाल रंगाच्या अक्षरामध्ये मराठीमध्ये भारत सरकार असे लिहलेली पाटी, तसेच GOVT.OF INDIA असे लिहलेली पाटी व वाहनावर लावण्यासाठी वारण्यात येणारा भारतीय राष्ट्रध्वज अशा वस्तू मिळून आल्या.
त्याने सुरक्षेसाठी विकास प्रकाश पांडागळे नावाचा खाजगी बॉडीगार्ड सोबत ठेवला होता.हा सर्व तोतयागिरी प्रकार असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी दोघांच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.