पुण्यातील येरवडा येथे पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या तिघांना अटक करत पोलीसांनी काढली धिंड

Spread the love

पुण्यातील येरवडा येथे पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या तिघांना अटक करत पोलीसांनी काढली धिंड

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – पुण्यात येरवडा परिसरात पेट्रोल पंपावर घडलेली घटना चांगलीच गाजत आहे. गुंजन थिएटरच्या बाजूलाच असलेल्या पंपावर तीन तरुणांनी अचानक धिंगाणा घातला. साध्या पेट्रोल भरण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद काही मिनिटांतच हाणामारीपर्यंत पोहोचला. पंपाच्या कर्मचाऱ्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती तिघे आक्रमक झाले आणि थेट शस्त्र काढून कामगारांवर वार करू लागले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पंपावर काम करणारे सर्व कर्मचारी घाबरून गेले. परिसरातसुद्धा गोंधळ उडाला. कामगारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर आरोपींनी ‘तुम्ही पोलिसांत तक्रार केली तर तुमचा जीव घेऊ’ अशी उघडी धमकी दिली. त्यामुळे कामगारांनी काही क्षण स्थिती सांभाळली, पण शेवटी एकाने हिम्मत करून येरवडा पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तिघांचा शोध सुरू केला. आरोपी कृष्णा प्रभाकर नाईक (२५), अक्षय उर्फ आबा जमदाडे (२५) आणि अली रफीक शेख (२५) हे तिन्ही जण वादानंतर थेट पळून गेले होते. सुरुवातीला ते आसपासच्या भागात लपून बसले होते, पण पोलिसांनी केलेल्या तपासातून ते कल्याणीनगरच्या नदीपात्रात आसरा घेतल्याची माहिती मिळाली.

ही माहिती पक्की होताच पोलिसांनी रात्रीच पथक तयार केलं. नदीपात्राच्या भोवती काही तास गुप्त नजर ठेवून शेवटी आरोपी जाळ्यात अडकले. कोणताही प्रकार होऊ नये म्हणून पथकाने नीट आखलेल्या कारवाईत तिघांना जेरबंद करण्यात आलं. या गुंडांना फक्त अटक करूनच पोलिसांची कारवाई संपली नाही तर ज्या ठिकाणी या तिघांनी उच्छाद मांडला होता त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसून पोलिसांनी त्यांची धिंड देखील काढली.

या संपूर्ण ऑपरेशनमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे आणि सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान यांनी पथकाचे नेतृत्व केले. गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, तसेच कर्मचारी शिंदे, कोकणे, वाबळे, सोगे, कांबळे आणि सुतार यांनी ही कारवाई यशस्वी केली. घटनास्थळी अचानक तयार झालेलं तणावपूर्ण वातावरण, आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न, आणि त्यानंतर पोलिसांनी केलेली जलद कारवाई या सर्वामुळे हा प्रकार येरवडा भागात चांगलाच चर्चेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon