डोंबिवलीतील भूखंड विकासात कर सल्लागाराची २१.९० लाखांची फसवणूक; ठाण्यातील विकासकाविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : भोपर गाव हद्दीतील भूखंड विकासाच्या व्यवहारात डोंबिवलीतील एका कर सल्लागाराची तब्बल २१ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ठाण्यातील विकासकाने भागीदारीत केलेल्या कराराचे उल्लंघन करून परस्पर भूखंड तृतीय पक्षाला दिल्याने ही आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. मानपाडा पोलिसांनी विकासकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
तक्रारदार गोविंद भिमजी पटेल (५७) हे कर सल्लागार असून डोंबिवली पूर्वेतील टिळक चौक परिसरात राहतात. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ठाण्यातील मानपाडा-चितळसर भागात राहणाऱ्या कांती रतनशी शहा यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार जून २००७ ते ऑगस्ट २०१९ या काळात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवलीजवळील २७ गाव हद्दीतील भोपर येथील सर्वे क्रमांक २३९-४ मधील भूखंड विकसित करण्यासाठी शहा यांनी स्वारस्य दाखवले होते. त्या अनुषंगाने ६ जुलै २००७ रोजी विकास करारनामा दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात आला. करारनामा झाल्यानंतर कर सल्लागार पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकासकाने २१.९० लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विकसन करारातील अटींनुसार शहा यांनी पटेल यांच्यासोबत संयुक्त भागीदारीत भूखंड विकासाचे निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, कराराचे पालन न करता शहा यांनी तक्रारदाराची कोणतीही संमती न घेता संबंधित भूखंड ईरा होम्स या बिल्डरला विकासासाठी देत करार केला. त्यातून मिळालेला मोबदला पूर्णपणे स्वतःकडे ठेवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
कराराचे उल्लंघन करून आर्थिक फसवणूक केल्याचे नमूद करत पटेल यांनी मानपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोले पुढील तपास करत आहेत.