आरटीओसह ५ अधिकाऱ्यांवर गुन्हा; तरीही अटक नाही
खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट उघड; नागपुरात पोलिसांची भूमिका संशयास्पद
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर : परिवहन विभागातील अंतर्गत वाद किती खोल गेले आहेत, याचे धक्कादायक उदाहरण नागपुरात समोर आले आहे. सहकाऱ्यालाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी रचलेला कट उघड झाल्यानंतरही सीताबर्डी पोलिसांनी आरोपी असलेल्या पाचही आरटीओ अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई अद्याप सुरू केलेली नाही. गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले तरी संशयितांना चौकशीसाठी पाचारणदेखील न केल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रवींद्र भुयार यांना फसवण्याचा कट रचल्याप्रकरणी आरटीओ विभागातील विजय चव्हाण, दीपक पाटील, लक्ष्मण खाडे, हेमांगिनी पाटील आणि आणखी एक अशा पाच जणांविरोधात सीताबर्डी पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. बदलीची बेकायदेशीर योजना आखणे, वरिष्ठ अधिकाऱ्याला फसवून बदनाम करणे, तसेच चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून कारकिर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अशा गंभीर आरोपांचा या अधिकाऱ्यांवर समावेश आहे.
या प्रकरणाचा उलगडा जानेवारी २०२३ मधील महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या चौकशीत झाला. आरटीओ अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीमध्ये त्यांच्या बॅचमेट विजय चव्हाण यांना लाभ मिळावा म्हणून दीपक पाटील यांच्या मदतीने ‘खोटा अहवाल’ तयार झाल्याचा आरोप समितीतील अशासकीय सदस्या अनिता दार्वेकर यांनी केला. दार्वेकर यांनी उघड केलेल्या बाबींसह रवींद्र भुयार यांनी न्या. दालनात सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करून न्यायालयीन आदेशांवरून संबंधित पाचही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र प्रकर्णाची गंभीरता आणि स्पष्ट पुरावे असूनही अजूनपर्यंत एकाही आरोपीला अटक किंवा चौकशीसाठी पाचारण करण्यात आलेले नाही. यामुळे “फौजदारी स्वरूपाचे गंभीर आरोप असतानाही पोलिस कट रचणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
*याबाबत विचारले असता वरिष्ठ ठाणेदार विठ्ठलसिंह राजपूत म्हणाले,*
*“आरटीओच्या पाच जणांवर गुन्हा दाखल असला तरी प्रकरण तपासाधीन आहे. सध्या मी अधिक काही सांगू शकत नाही.”*
नागपुरात परिवहन खात्यातील या अंतर्गत सत्तासंघर्षाने अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.