इंस्टाग्राम ‘रीलस्टार’कडून उच्चशिक्षित तरुणींची फसवणूक; ३७ लाखांचे दागिने, बीएमडब्ल्यू आणि आयफोन जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : इन्स्टाग्रामवर लोकप्रिय असलेल्या ‘रीलस्टार’ शैलेश रामगुडे याला विष्णूनगर पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. उच्चशिक्षित, नामांकित कंपन्यांत कार्यरत तरुणींशी सोशल मीडियावर मैत्री करून, प्रेमाच्या नाटकातून त्यांच्याकडून दागिने आणि पैसे उकळण्याचा त्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी रामगुडेच्या ताब्यातून तब्बल ३७ लाख रुपये किमतीचे दागिने, सुमारे १ कोटीची बीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे आयफोन जप्त केले. या प्रकरणात आणखी तक्रारी समोर येण्याची शक्यता असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमा यांनी सांगितले.
फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
डोंबिवलीतील एका उच्चभ्रू कुटुंबातील तरुणीचे दागिने घरातून गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तिची चौकशी केली. त्यावेळी तिने आपल्या प्रियकराला—शैलेश रामगुडे—सर्व दागिने दिल्याचे कबूल केले. संशय वाढताच कुटुंबीयांनी त्याची माहिती घेतली असता ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात दोन तरुणींसोबत फसवणुकीचे गुन्हे आधीच नोंद असल्याचे समोर आले. यापूर्वीही त्याला अटक झाली असल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सोशल मीडियावरून ‘प्रेमजाळे’
तपासात उघड झाले की रामगुडे इंस्टाग्रामवरून तरुणींशी मैत्री करत असे. ‘रीलस्टार’ म्हणून मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेत, तो तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. विश्वास संपादन केल्यानंतर कधी ईडीची रेड पडल्याची खोटी कहाणी, तर कधी इतर आर्थिक संकटांचे नाटक करून त्यांच्या कडून दागिने आणि पैसे घेत असे. अनेक तरुणी उच्चशिक्षित असून काही जणी आयटी इंजिनिअर पदावर कार्यरत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
विष्णूनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे आणि पोलीस निरीक्षक गहनीनाथ सर्जेराव गमे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ठाण्यातील हिरानंदानी येथील त्याच्या राहत्या घरातून रामगुडेला ताब्यात घेतले. घरातून मोठ्या प्रमाणात दागिने, लक्झरी कार आणि महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
या प्रकरणामुळे डोंबिवली आणि ठाणे परिसरात खळबळ उडाली असून, आणखी किती तरुणी या फसवणुकीचे बळी ठरल्या आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.