सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड; मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यातील सीएनजी रिक्षा-टॅक्सी, बस प्रवासावर परिणाम

Spread the love

सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड; मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यातील सीएनजी रिक्षा-टॅक्सी, बस प्रवासावर परिणाम

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने त्याचा परिणाम सीएनजी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. असं असलं तरी घरगुती पीएनजी ग्राहकांना मात्र कोणत्याही व्यत्ययाशिवाय गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याचं महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात महानगर गॅस लिमिटेडकडून गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र, आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला होणारा सीएनजी गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. याचा फटका मुंबईत गॅस पुरवठ्यावर झाल्याचं पाहायला मिळतंय.

मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खाजगी वाहनांना या टंचाईचा सामना करावा लागणार आहे. हा पुरवठा कधीपर्यंत पूर्ववत होणार याची निश्चित माहिती नाही. त्यामुळे सोमवार या परिस्थितीचा वाहतुकीवर, प्रवाशांवर आणि सार्वजनिक वाहनसेवेवर नेमका किती परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

महानगर गॅस लिमिटेड कंपनीने या संबंधी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून सीएनजी सेवा लवकरच पूर्ववत करण्यात येईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. तसेच याचा परिणाम घरगुती गॅस पुरवठ्यावर होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाइपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे, वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला (सिएनजी) गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे.

एमजीएल त्यांच्या घरगुती PNG ग्राहकांना पुरवठा कोणत्याही व्यत्ययाशिवाय प्राधान्याने सुरू ठेवेल याची खात्री करत आहे. तथापि, सीजीएस वडाळा आणि एमजीएल पाईपलाइन नेटवर्कद्वारे गॅस पुरवठा थांबल्यामुळे, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक उपक्रमांसाठी समर्पित सीएनजी स्टेशनसह सीएनजी स्टेशन चालू शकत नाहीत.

बाधित भागातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नुकसान दुरुस्त झाल्यानंतर आणि सीजीएस वडाळा येथे पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर एमजीएलच्या नेटवर्कमधील गॅस पुरवठा सामान्य होईल. झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon